(राजापूर / वार्ताहर)
कुंभवडे गावचे सुपुत्र आणि आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर येथील वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक शैलेंद्र बापू प्रभुदेसाई यांना पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘महाराष्ट्र गौरव सन्मान–२०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे कला, शिक्षण, समाजसेवा, शेती आणि उद्योजकता या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. प्रभुदेसाई यांनी २०२२ ते २०२५ या कालावधीत कुंभवडे गावचे ‘तंटामुक्त अध्यक्ष’ म्हणून सलग तीन वर्षे जबाबदारी सांभाळत समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वाद यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले असून, स्थानिक पातळीवर तंटे मिटवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. न्याय्य, पारदर्शक आणि संयमी कार्यपद्धतीमुळे त्यांचे कार्य विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत ते गेल्या पाच वर्षांपासून दर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या करिअरबाबत मोफत समुपदेशन व मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्याला दिशा देत आहेत.
प्रा. प्रभुदेसाई हे उत्कृष्ट निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणूनही परिचित आहेत. अनेक शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने कार्यक्रमांची शोभा वाढवली आहे. २०२१ पासून एलआयसी प्रतिनिधी म्हणून कार्य करताना त्यांनी ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठीही मोलाचे योगदान दिले आहे.
शिक्षणासोबत संशोधन क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला असून, अलीकडेच त्यांच्या नावावर संशोधनाधारित पेटंट मंजूर झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक बनवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यात आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश विटकर आणि सचिव तेजस्विनी दिवटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
हा सन्मान महाविद्यालय, सहकारी, विद्यार्थी आणि कुंभवडे गावासह तालुक्यातील ग्रामस्थ तसेच पत्रकार बंधूंच्या पाठिंब्यामुळेच मिळाल्याचे सांगत प्रा. प्रभुदेसाई यांनी सर्वांचे आभार मानले. पुढील काळातही कला, शिक्षण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यामुळे राजापूर तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

