(गुहागर / रत्नागिरी)
निसर्गसौंदर्याने नटलेल्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा परदेशी पाहुण्याचे आगमन झाले आहे. तालुक्यातील असगोली समुद्रकिनारी फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्याचे दर्शन घडल्याने पर्यटक आणि पक्षी निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांनंतर गुहागरच्या किनारपट्टीवर हा पक्षी दिसल्याने त्याच्या आगमनाची पक्षीप्रेमींमध्ये विशेष चर्चा सुरू झाली आहे. वन विभागानेही या दर्शनाची नोंद ई-बर्ड अॅपवर केली आहे.
असगोली समुद्रकिनारी फ्लेमिंगो दिसल्याची माहिती गुहागर येथील चिन्मय कचरेकर यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनरक्षक अरविंद मांडवकर यांनी पक्षी निरीक्षक अक्षय खरे यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करताना फ्लेमिंगो दिसून आला. त्यानंतर वनरक्षक मांडवकर यांनी या पक्ष्याच्या दर्शनाची नोंद ई-बर्ड ऍपमध्ये केली. गुहागर तालुक्यातील तवसाळ, हेदवी आणि अंजनवेल परिसरात काही वर्षांपूर्वी फ्लेमिंगोचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता असगोलीच्या किनाऱ्यावर या पक्ष्याची उपस्थिती नोंदवली गेल्याने स्थानिक पक्षी निरीक्षकांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे.
फ्लेमिंगो हा उथळ खाऱ्या पाण्याच्या प्रदेशात, चिखलमय भागात आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या अधिवासात आढळणारा पक्षी आहे. पाण्यातील शेवाळ, लहान खेकडे, कीटक आणि सूक्ष्म जलजीव गाळून खाण्याची त्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. त्याच्या आहारातील ‘कॅरोटीनॉइड’ या रंगद्रव्यामुळे पिसांना गुलाबी छटा प्राप्त होते. लांब पाय, वक्र मान आणि खाली वळलेली चोच यांमुळे हा पक्षी सहज ओळखता येतो. फ्लेमिंगो हा स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखला जातो. अन्नाची उपलब्धता आणि अनुकूल अधिवासाच्या शोधात हे पक्षी लांबचा प्रवास करतात. हिवाळ्यात भारताच्या विविध किनारी भागांतही त्यांचे दर्शन घडते. असगोली येथे दिसलेला फ्लेमिंगो स्थलांतराच्या प्रवासात या किनाऱ्यावर आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तो भरकटून आला आहे की स्थलांतरादरम्यान येथे थांबला आहे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
‘ग्रेटर फ्लेमिंगो’ असण्याची शक्यता
असगोली किनाऱ्यावर दिसलेला पक्षी ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा फ्लेमिंगोच्या प्रजातींमधील आकाराने मोठा पक्षी असून त्याचा रंग पांढरट ते फिकट गुलाबी असतो. त्याची चोच मधल्या भागात खाली वळलेली असते. मात्र, पक्ष्याची प्रजाती निश्चित करण्यासाठी अधिक तपशीलवार निरीक्षण आवश्यक आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर लाभलेले या गुलाबी पाहुण्याचे दर्शन केवळ पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेले नाही, तर किनारपट्टीवरील पक्षीवैविध्याची नोंद घेण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरले आहे. या आगमनामुळे स्थानिक पक्षी निरीक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.


