( गुहागर )
वर्षअखेर आणि नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांवर आज (शनिवारी) दुपारी हृदयद्रावक प्रसंग ओढवला. मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या तिघा तरुणांना समुद्रातील जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. या घटनेत अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांना स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचवण्यात यश आले.

आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास हे तिघे पर्यटक गुहागर समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. सुरुवातीला परिस्थिती सामान्य होती. मात्र काही क्षणांतच समुद्रातील भरतीमुळे प्रवाह तीव्र झाला आणि तिघेही पर्यटक खोल पाण्यात अडकले. तेथील लोकांची आरडाओरड ऐकताच किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक, नगरपंचायतीचे जीवरक्षक तसेच वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी यांनी कोणताही विलंब न करता समुद्रात उड्या मारून बचावकार्य सुरू केले. कोणतीही सुरक्षा साधने नसतानाही जीव धोक्यात घालून त्यांनी तिघांना बाहेर काढले.
अमोल विजयकुमार मुथ्थू, वय 42 राहणार पवई मुंबई असे बुडून मयत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत आलेली त्याची पत्नी श्वेता अमोल मुथ्थू, वय 42, मुलगा विहान अमोल मुथ्थू, वय 13 या दोघांचे प्राण केवळ नगरपंचायतीच्या जीवरक्षकांच्या व त्यांना सहकार्य करणारे गुहागर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी, सोहम सातार्डेकर यांच्यामुळेच या दोघांचे प्राण वाचले आहेत.
या घटनेत अमोल मुथिया यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांना तातडीने गुहागर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, समुद्रातील धोकादायक प्रवाहाबाबत वारंवार सूचना, चेतावणी फलक आणि इशारे दिले जात असतानाही काही पर्यटक दुर्लक्ष करतात, यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने पर्यटकांनी समुद्रात उतरताना अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

