(गुहागर)
गुहागर–विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असताना या मार्गालगतच्या जमीनमालकांना मोबदल्यासंदर्भातील नोटिसा देण्यास महसूल विभागाने सुरुवात केली आहे. चिपळूण तालुक्यातील संबंधित गावांच्या तलाठ्यांकडून या नोटिसा वाटपात येत असून उताऱ्यावर नावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्ररित्या नोटीस स्वीकारावी लागत असल्याने विशेषतः माहेरवाशिणींची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत वास्तव्यास असलेल्या अनेक महिलांना अचानक माहेरी बोलावून नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावावी लागत आहे. जमीन चौपदरीकरणात गेल्यानंतर मोबदला उपलब्ध होणार असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्ष मोबदला कधी मिळणार याबाबत मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जमीनमालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.
दरम्यान, उताऱ्यातील नावे तपासताना अनेक ठिकाणी माहेरवाशिणींच्या नावांमध्ये गंभीर चुका आढळून आल्या आहेत. नाव माहेरचे तर आडनाव सासरचे, किंवा उलटपक्षी अशी विसंगती आढळत असल्याने संबंधित महिलांना प्रथम आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रतिज्ञापत्र, गॅझेट प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. त्यानंतर तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ही सर्व कागदपत्रे सादर करून उताऱ्यात नाव दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.
एकीकडे नोटीस स्वीकारण्यासाठी, तर दुसरीकडे उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी होत असलेली ही ‘दुहेरी धावपळ’ नागरिकांना आर्थिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर त्रस्त करत आहे. शासनस्तरावर मोबदल्यासंदर्भातील निर्णय झाला असला तरी प्रत्यक्ष रक्कम जमीनमालकांच्या हाती नेमकी कधी येणार याविषयी अद्यापही खात्रीशीर माहिती न मिळाल्याने लोकांच्या मनातील प्रश्न कायम आहेत.

