(गुहागर)
नमन लोककला संस्था, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील पारंपरिक नमन मंडळे व ज्येष्ठ नमन कलाकारांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि. १० जानेवारी २०२६) गुहागर येथील भंडारी सभागृहात पार पडला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात नमन लोककलेचा जागर करत कलाकारांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी उमराठ खुर्द आंबेकरवाडी नमन मंडळातील स्त्रीपात्र साकारणारे ज्येष्ठ कलाकार गोविंद गोपाळ आंबेकर तसेच उमराठ येथील श्री नवलाई नमन मंडळातील विनोदी व स्त्रीपात्र साकारणारे कलाकार भिकू लक्ष्मण मालप यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या नोंदणीनुसार गुहागर तालुक्यात सुमारे ७५ नमन मंडळे कार्यरत असून, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ३५ नमन मंडळांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या करमणूक व मनोरंजन भागात वरवेली रांजाणेवाडी येथील नमन मंडळाने सादर केलेले नमन विशेष आकर्षण ठरले.
या सोहळ्यात उमराठ येथील श्री नवलाई नमन मंडळ तसेच उमराठ खुर्द आंबेकरवाडी नमन मंडळालाही सन्मानित करण्यात आले. श्री नवलाई नमन मंडळाच्यावतीने काशीराम गावणंग, संदीप गोरिवले, शांताराम गोरिवले, भिकू मालप, गणपत गावणंग, भागोजी गावणंग, उदय गावणंग, महेश गोरिवले, राजाराम घाडे, चंद्रकांत घाडे, शांताराम गावणंग व गंगाराम माईन यांनी सन्मान स्वीकारला. तर उमराठ खुर्द आंबेकरवाडी नमन मंडळाच्यावतीने गोविंद आंबेकर, दत्ताराम आंबेकर, यशवंत आंबेकर, जनार्दन आंबेकर, मुकुंद आंबेकर, वासंती आंबेकर, राधा आंबेकर व कुमार श्याम आंबेकर यांनी सन्मान स्वीकारला.
कार्यक्रमात बोलताना उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी गुहागर तालुक्यातील सर्व नमन मंडळे पारंपरिक नमन लोककला जपतानाच त्यात आवश्यक ते आधुनिक बदल स्वीकारत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

