(लांजा /रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर कुवे-पुरगाव येथे दुचाकीने मागून दिलेल्या जोरदार धडकेत मेस्ट्रो दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) याच्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास सखाराम भोवड (वय ३४) यांचे सासरे मेस्ट्रो दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एसी १८८९) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळेच्या दिशेने जात होते. ते कुवे-पुरगाव येथे आले असता, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रथमेश करंबळे याच्या ताब्यातील डिओ दुचाकीने (क्रमांक एमएच ०८ एएम ९२२७) त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत मेस्ट्रो दुचाकीवरील व्यक्तीला दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तसेच वाहनांचेही नुकसान झाले.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी प्रथमेश करंबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.


