(गुहागर)
तालुक्यातील नरवण गावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आणि प्रयोगशील शेतकरी डॉ. अनिल जोशी (वय ७०) यांचे शनिवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी, मूळगाव नरवण येथे करण्यात आले.
रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, खरेदी-विक्री संघाचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आरोग्य सेवेतील त्यांचा ठसा कायम राहिला.
नरवणसारख्या दुर्गम भागात आधुनिक रुग्णालय उभारून त्यांनी स्थानिकांना वैद्यकीय सोय उपलब्ध करून दिली. नारळ व आंबा बागायतदार तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. नारळ विकासासाठी गट स्थापन, प्रशिक्षण शिबिरे, संशोधकांचे मार्गदर्शन, औषध-खते पुरवठा, तसेच प्रक्रियायुक्त उद्योग उभारणीद्वारे रोजगारनिर्मिती यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
रोटरी क्लब ऑफ गुहागरचे २००७ मधील अध्यक्षपद भूषवताना त्यांनी आरोग्य शिबिरे, मोफत जयपूर फूट वाटप, रक्तगट तपासणी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला व स्पर्धा अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी केली. गावातील रस्ते, वीज सुविधा आणि ग्रंथालय उभारणीसारख्या विकासकामांत त्यांचा मोलाचा सहभाग राहिला.
त्यांच्या निधनाने गुहागर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याने एक समर्पित डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेता गमावला आहे.

