( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने रत्नागिरी तालुक्यात संघटनात्मक हालचालींना अधिक वेग दिला असून, जिल्हा महिला अध्यक्ष विरश्री बेटकर आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी बैठका व भेटीगाठींचा धडाका सुरू आहे. खालगाव विल्ये, फणसवळे आडोम, पानवल, पाली–हातखंबा, केळ्ये, वळके, कोतवडे आणि ओरी आदी गावांमध्ये गट–गणनिहाय भेटी घेत कार्यकर्ते व नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. या भेटींच्या माध्यमातून केवळ संघटन मजबूत करण्यावरच नव्हे, तर संभाव्य उमेदवारांची चाचपणीही सुरू असल्याचे चित्र आहे.
याच अभियानाचा भाग म्हणून मौजे कोतवडे येथे वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुक्याची गावभेट व बैठक पार पडली. ठिकठिकाणी झालेल्या बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी विनोद कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करत बूथ पातळीवरील बांधणी, मतदारांशी थेट संपर्क आणि सक्षम नेतृत्व उभे करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव बिपीन आयरे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, वैभव यादव, सुनील कांबळे, सल्लागार अजित जाधव व विजय पालकर, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, कोषाध्यक्ष विष्णू गायकवाड उपस्थित होते. तसेच कोतवडे शाखेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सल्लागार चंद्रशेखर कांबळे, महिला सचिव अनुष्का कांबळे व रेश्मा कांबळे, नरेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रस्थापित पक्षांच्या पारंपरिक राजकारणाला पर्याय
संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देत बूथ पातळीवर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर, सर्वसामान्य जनतेतून उदयास येणाऱ्या प्रामाणिक, संघर्षशील आणि लोकांशी नाळ जोडलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची तयारीही सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे प्रस्थापित पक्षांच्या पारंपरिक राजकारणाला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीची ही रणनिती केवळ सत्तेसाठी नसून, वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित समाजघटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून राजकीय संघर्ष उभारण्याची असल्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे. आगामी निवडणुकांत ही भूमिका मतदारांपर्यंत कितपत प्रभावीपणे पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

