(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड होऊनही जुळ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, माजी सैनिक पत्नी सौ. खुशी मनोज रेडीज यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे अधिकृत अपील अर्ज दाखल केला आहे. पंचायत समिती खेडच्या निर्णयाला आव्हान देत प्रवेश रद्द आदेश स्थगित करून मुलांचा प्रवेश कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सन २०२६-२७ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत कु. क्रिश मनोज रेडीज आणि कु. कायरव मनोज रेडीज या जुळ्या विद्यार्थ्यांची शासनाच्या लॉटरी प्रक्रियेद्वारे निवड झाली होती. आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अचानकपणे “ऑनलाइन अर्जातील पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे” कारण देत प्रवेश रद्द करण्यात आल्याचा आरोप अपील अर्जात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ स्थानिक चौकशीच्या आधारे विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करणे हा नैसर्गिक न्याय तत्त्वांच्या विरोधातील निर्णय असल्याचा दावा अर्जदार महिलेने केला आहे. पोलिस पाटील यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करताना, “घर बंद आढळणे किंवा संपर्क न होणे म्हणजे संबंधित व्यक्ती त्या पत्त्यावर राहत नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही,” असा मुद्दाही अपीलमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, प्रवेश रद्द करण्यापूर्वी कोणतीही सुनावणी किंवा स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःकडे संबंधित पत्त्याचे वैध आणि कायदेशीर कागदोपत्री पुरावे उपलब्ध असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे खेड तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश निश्चित केल्यानंतर अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
दरम्यान, “माझी बाजू प्रत्यक्ष ऐकून घेऊन सादर केलेली रहिवासी कागदपत्रे ग्राह्य धरावीत आणि मुलांचा आरटीई प्रवेश कायम ठेवावा,” अशी मागणी सौ. रेडीज यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. आता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी या अपीलवर कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

