( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एक्सल फाटा परिसरात ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षामधील ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अक्षय धोंडीराम जाधव (सध्या रा. आवाशी समर्थनगर, मूळ रा. शाहूवाडी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या रिक्षा प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: संतोष दशरथ शिंदे, अंजली सावंत, सुरेखा सुरेश सावंत, शैलेश सदानंद तांबे, व्रिज किशोर चौरासिया, राहुल गुलाबचंद पाटील, संतोष हिराजी तांबे, विजय कुमार शेखर जैस्वाल आणि बिंदुकुमार जितेंद्र सिंह.
या प्रकरणी रिक्षा चालक संतोष दशरथ शिंदे (वय ५७, व्यवसाय – रिक्षाचालक, रा. सोनगाव बागवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या ताब्यातील डमडम रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यू ८८९७) मधून प्रवासी घेऊन ते पटवर्धन लोटे ते पीरलोटे दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना, चिपळूण बाजूकडून आलेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच ०८ एएक्स ६२४५) ने महामार्ग क्रॉस करून MIDC रोडकडे वळताना रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटून अपघात झाला.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.