(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवळे नं. १ या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘महिला सक्षमीकरण : काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ए. ए. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल येथे तालुकास्तरीय पथनाट्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील आठ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवळे नं. १ च्या विद्यार्थ्यांनीही आपले सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पाठांतर, समयसूचकता, कल्पकता आणि शब्दांची अचूक फेक यांचा प्रभावी वापर करत ‘महिला सक्षमीकरण : काळाची गरज’ या विषयावर पथनाट्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तालुका शिक्षणाधिकारी परीट यांच्या हस्ते झाला. यावेळी विस्तार अधिकारी नाईक व बळवंतराव तसेच केंद्र समन्वयक शेख उपस्थित होते. शेख यांनी या यशाबद्दल शाळेचे आवर्जून अभिनंदन केले.
शाळेच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि पालकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


