(दापोली /रत्नागिरी)
घराशेजारील भिंतीवर चढून शेवग्याच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना तोल जाऊन खाली पडल्याने ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दापोलीतील गंधर्वनगरी येथे घडली. प्रदीप राजाराम शिगवण (वय ६८, रा. गंधर्वनगरी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शिगवण हे घराच्या बाजूला असलेल्या सुमारे आठ फूट उंच कंपाउंडच्या भिंतीवरून शेवग्याच्या झाडाच्या फांद्या तोडत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते सागर गजानन वरवटकर यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लादीच्या अंगणात पडले. या घटनेत त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव सुरू झाला.
शिगवण यांना तातडीने उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गंधर्वनगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


