(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर मार्गावर लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ६१ वर्षीय महिलेला दुचाकीची धडक बसून त्या जखमी झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री घडली. वंदना विठ्ठल आग्रे (रा. जोशी कंपाऊंड, दामले हायस्कूलशेजारी, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीचालक साझेब फजल जहागीरदार (वय २५, रा. रत्नागिरी) याच्याविरोधात ११ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वंदना आग्रे या लोटलीकर हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी आरोपी दुचाकीचालक आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अॅक्सेस दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एडी ११७२) घेऊन त्या मार्गावरून जात होता. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता दुचाकी हयगयीने व बेदरकारपणे चालविल्याने त्याने आग्रे यांना धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात त्यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार ईशिता रूपेश वाडावे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची नोंद मोटार अपघात रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ अशी असून, रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


