(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या वतीने तृतीय वर्षातील व माजी विद्यार्थ्यांसाठी कमर्शिअल बँक सिलेक्शन प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा ड्राईव्ह ग्लोबल आउटसोर्सिंग अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या उपक्रमाला आजी व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सहा. प्रा. वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखाप्रमुख व आयक्यूएसी समन्वयक सहा. प्रा. राखी साळगावकर, विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा.वैभव घाणेकर, तसेच प्लेसमेंट सेलचे सदस्य सहा. प्रा.. वैभव कीर व सहा. प्रा. असावरी मयेकर उपस्थित होते.
यावेळी ग्लोबल आउटसोर्सिंग अँड ट्रेनिंग सर्व्हिसेसचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. गणेश शहाणे व करिअर मार्गदर्शक श्री. हेमंत जगताप यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्लेसमेंट सेल समन्वयक सहा. प्रा. वसुंधरा जाधव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी शीतप हिने केले.
स्वागत समारंभानंतर मुलाखत प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री गणेश शहाणे यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध सोयी, संधी व रोजगाराच्या शक्यतांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच श्री. हेमंत जगताप यांनी मुलाखतीसाठी आवश्यक तयारी, आत्मविश्वास व सादरीकरण कौशल्य याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक मुलाखतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. संपूर्ण प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीपणे पार पडला.

