(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही प्रेमविवाह हा जणू अक्षम्य गुन्हा ठरवला जात असल्याचे धक्कादायक वास्तव चिपळूणमध्ये पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका विकृत टोळक्याने भरदिवसा कायदा हातात घेत एकाच कुटुंबातील पाच जणांवर लोखंडी कोयते, रॉड आणि काठ्यांनी निर्घृण हल्ला चढवला. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे शांत समजल्या जाणाऱ्या चिपळूण शहरात संतापाची लाट उसळली असून, गुंडांच्या या दादागिरीने पोलीस प्रशासनाच्या धाकावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानिया फैजान चौगुले (वय २२) आणि फैजान चौगुले यांनी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात धुमसत होता. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सानिया आणि फैजान भेंडीनाका परिसरातून जात असताना त्यांची दुचाकी बंद पडली. नेमकी हीच संधी साधत एका आरोपीने सानियाकडे पाहून उपहासात्मक हास्य केले. स्वाभिमानी फैजानने या प्रकाराचा जाब विचारताच, आरोपीने भररस्त्यात त्याची गचांडी धरून धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत आपली गुंडगिरी दाखवून दिली. हा प्रकार घडताच सानियाने आपल्या सासरच्या मंडळींना भेंडीनाका येथे बोलावून घेतले. मात्र, सुडाने पेटलेल्या आरोपींनी या वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात केले. गोवळकोट बायपास येथील एनरॉन पुलाजवळ आरोपींनी चौगुले कुटुंबीयांना गाठले आणि त्यांच्यावर लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी सपासप वार करत अक्षरशः हैदोस घातला. या जीवघेण्या हल्ल्यात रेहान साबळे, फैजान चौगले, सऊद चौगले, सलमा चौगुले आणि सानिया चौगुले हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरदिवसा शस्त्रे नाचवत दहशत माजवणाऱ्या या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल बाबासाहेब शेख (वय ६७), खालीद अब्दुल शेख (वय ४२), साहिल अब्दुल शेख (वय ३१), शाहिद अब्दुल शेख (वय २१), सिकंदर अब्दुल शेख (वय ४५, सर्व रा. आफ्रिन पार्क, मक्का-मदिना बिल्डिंग, गोवळकोट रोड), रुबीना जमीर मुजावर (वय ३८, रा. गोवळकोट रोड) आणि अमन फारूख शेख (वय २४, रा. अस्मिना अपार्टमेंट, गोवळकोट रोड) या सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११८(१), ११८(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
तरुण-तरुणींच्या वैयक्तिक निवडीचा आदर करण्याऐवजी त्यांच्या जीवावर उठणाऱ्या या प्रवृत्तीचा समाजातून तीव्र निषेध होत आहे. भरदुपारी शहराच्या वर्दळीच्या भागात कोयते आणि रॉड घेऊन फिरणाऱ्या या समाजकंटकांना कोणाचे अभय आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता चिपळूण पोलीस या सातही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शिक्षा घडवतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


