(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विहिरीच्या पाण्यावर तरंगणारा मृतदेह, काठावर पडलेली चप्पल आणि काठी, घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ; मात्र मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचे धाडस कोणीच करेना. अशा परिस्थितीत माजी सरपंचांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मजगाव येथील तीन तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत संतोष दादू आंबेकर (वय ४७) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
रविवारी सायंकाळी संकेत संजय कारकर हे भुताचे कातळ परिसरातील विहिरीजवळून जात असताना त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल आणि लाकडी काठी दिसली. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना बोलावून घेतले. मृत व्यक्तीच्या अंगावरील कपड्यांवरून हा मृतदेह गावातील संतोष आंबेकर यांचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांचे पुत्र दुर्वेश आंबेकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. विहिरीबाहेरील वस्तू आणि कपड्यांवरून त्यांनी मृतदेह वडिलांचाच असल्याची खात्री केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील माने यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन दांडे आडोमचे माजी सरपंच कैलास तांबे यांनी मजगावचे माजी सरपंच फैयाज मुकादम यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी तत्पर असणाऱ्या हरीश पोमेटकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच हरीश पोमेटकर, गफूर काझी आणि झियान मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरीश पोमेटकर आणि गफूर काझी यांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, तर झियान मुकादम यांनी विहिरीबाहेरून त्यांना मदत केली. तिघांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या या तत्परतेमुळे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
विहिरीत पडलेली मुकी जनावरे बाहेर काढणे, लोकवस्तीत शिरलेल्या विषारी सापांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे, अशा सामाजिक कामांत मजगाव येथील हे तरुण विनामूल्य मदत करतात. यावेळीही त्यांनी वेळ न दवडता दाखवलेल्या धाडसाचे पोलीस प्रशासन, माजी सरपंच आणि दांडे आडोम येथील ग्रामस्थांनी कौतुक केले. दरम्यान, मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी संतोष आंबेकर यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, मृत्यूच्या परिस्थितीबाबत पुढील तपास सुरू आहे.


