(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने खिडकीचे लोखंडी गज काढून बंगल्यात प्रवेश केला आणि टीव्हीसह तांब्याची भांडी व जुना टेपरेकॉर्डर असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील पाली-माईनवाडी येथे घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम विश्राम मांडवकर (वय ६०, रा. पाली-माईनवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालक सुरेंद्र सखाराम सावंत यांचा पाली-माईनवाडी येथे बंगला आहे. या बंगल्याच्या सर्व दरवाजांना कुलूप लावलेले होते. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान बंगल्यात कोणीही नसल्याची संधी अज्ञात चोरट्याने साधली. चोरट्याने बंगल्याच्या समोरील खिडकीला लावलेले लोखंडी ग्रील काढले आणि खिडकी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील वस्तूंची तपासणी करून चोरट्याने किमती वस्तू लंपास केल्या.
चोरट्याने सुमारे १५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा ५५ इंची फ्लॅट टीव्ही चोरून नेला. याशिवाय अंदाजे ५०० रुपये किमतीचे तीन ते चार किलो वजनाचे तांब्याचे पातेले, सुमारे १,५०० रुपये किमतीचे तीन तांब्याचे तांबे (लोटे), तांब्याच्या मुत्या तसेच जुना टेपरेकॉर्डर असा मुद्देमालही चोरीस गेला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंद घर हेरून खिडकीचे ग्रील काढत चोरट्याने बंगल्यात प्रवेश केल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून परिसरातील माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

