(रत्नागिरी / वार्ताहर)
कै. विनायक वासुदेव पेठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत साहस नारकर याने आठही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पटवर्धन हायस्कूल येथे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे १२० खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आठ फेऱ्यांच्या या स्पर्धेत चिपळूण, राजापूर, लांजा, मंडणगड, खेड, देवरुख, संगमेश्वर यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतील बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे आयोजन एकदिवसीय रॅपिड स्वरूपात करण्यात आले होते. मुख्य गटासह ७, ९, ११, १३ आणि १५ वर्षांखालील खेळाडू, १६ ते ३५ आणि ३६ ते ५५ वयोगट, महिला, अनरेटेड तसेच ज्येष्ठ खेळाडूंसाठी स्वतंत्र पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम २४ हजार १०० रुपये होती. मुख्य गटातील पहिल्या १५ क्रमांकांच्या खेळाडूंना रोख पारितोषिके, तर अन्य गटांतील विजेत्यांना चषक आणि पदके देऊन गौरविण्यात आले.
मुख्य गटात साहस नारकर याने आठपैकी आठ गुण मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. या कामगिरीबद्दल त्याला ६ हजार रुपये रोख आणि चषक प्रदान करण्यात आला. सौरिश कशेळकर याने सात गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर लवेश विजय पावसकर याने तृतीय स्थान पटकावले. अवधूत पटवर्धन चौथ्या, तर यश गोगटे पाचव्या क्रमांकावर राहिले.
मुख्य गटातील सहाव्या ते पंधराव्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे चैतन्य भिडे, यश खेर, श्रीहास नारकर, सुमित आंब्रे, शान याहू, विहंग सावंत, अक्षय देवळकर, ओम तेरसे, प्रवीण सावर्डेकर आणि सोहम रुमडे यांनी स्थान मिळवले.
अनरेटेड गटात सचिन पाटील, मानस नागवेकर, उपेंद्र लळीत, ओंकार आगाशे आणि आर्यन कराडे यांनी यश संपादन केले. ज्येष्ठ गटात सुहास कामतेकर आणि सुनील शिंदे, तर महिला गटात खुशी विश्वकर्मा, समीण कोंडकरी, सानवी दामले, आकांक्षा केळकर आणि धर्मी पटेल यांनी यश मिळवले.
१६ ते ३५ वयोगटात मिलिंद सावंत, सार्थक साबळे आणि साईप्रसाद साळवी यांनी, तर ३६ ते ५५ वयोगटात मिलिंद नरवणकर, विवेक गजानन जोशी आणि गिरीश करमरकर यांनी यश संपादन केले.
वयोगटानुसार झालेल्या स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात हर्ष चव्हाण, ओम उत्तेकर, मोहम्मदसामी माजगावकर, शान बिरवाडकर आणि नंदन मनोज दामले यांनी यश मिळवले. १३ वर्षांखालील गटात अथर्व साठे, अद्वैत शानभाग आणि आयुष रायकर यांनी, तर ११ वर्षांखालील गटात विराज बनसोड, शर्विल शहाणे, पारस मुंडेकर, अर्णव गावखडकर आणि हार्दिक मयेकर यांनी स्थान मिळवले.
९ वर्षांखालील गटात आरव निमकर, अमेय लाटे, अंशुल मिरजकर, आयुष खानागावकर आणि मार्मिक मानके यांनी, तर ७ वर्षांखालील गटात मानस भालेकर, श्रेष्ठ दीक्षित, चैतन्य धुपकर आणि आस्तिक कुलकर्णी यांनी यश संपादन केले.
स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी मुख्य पंच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच (आयए) विवेक सोहनी यांनी सांभाळली. उपेंद्र खेर, वरद पेठे, सुयश पेठे आणि प्राची मयेकर यांनी सहपंच म्हणून काम पाहिले. पेठे परिवाराच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, आकर्षक चषक आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
कै. विनायक वासुदेव पेठे यांच्या स्मृती जपण्याबरोबरच सात वर्षांखालील बालखेळाडूंपासून ज्येष्ठ बुद्धिबळपटूंपर्यंत सर्वांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध झाली. स्पर्धेचे नियोजन उत्तम झाल्याने दरवर्षी यापेक्षा अधिक व्यापक स्वरूपात स्पर्धा आयोजित करावी, अशी अपेक्षा स्पर्धक आणि पालकांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पटवर्धन हायस्कूल, पंच, खेळाडू आणि पालकांचे आयोजकांनी आभार मानले.


