(देवळे / प्रकाश चाळके)
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (एसआयआर) नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोंडउमरे येथील पवारवाडीमध्ये चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत उपस्थित ग्रामस्थांना एसआयआर प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहण्यासाठी मतदारांनी बीएलओ (BLO) यांच्याकडून नवीन मतदार यादी तपासून त्यामध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले. मतदार यादीत नाव नसल्याचे किंवा अन्य कोणतीही त्रुटी आढळल्यास वेळीच आवश्यक कार्यवाही करून घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
या चौपाल सभेला संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काशीराम वाजे, कार्याध्यक्ष रवींद्र गुरव, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, व्हीजेएनटी तालुकाध्यक्ष रामचंद्र बाबाजी साबळे, उपाध्यक्ष दिलीप मोहिते आणि संगमेश्वर तालुका लीगल सेलचे ॲड. लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते.
यावेळी पवारवाडीचे अध्यक्ष प्रमोद पवार, माजी अध्यक्ष सुधीर पवार, गावकर मनोहर पवार, सदस्य प्रकाश पवार, बळीराम सोलकर, प्रकाश पवार, सुदेश पवार, शिवाजी पवार, वसंत लाड, तसेच प्रणव कदम आणि अमित पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मतदार यादीतील नोंदींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात चौपाल सभांचे आयोजन करण्यात येत आहे.


