(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरालगतच्या फिनोलेक्स वसाहत कॉलनी फेज-३ येथील आकाश इमारतीत अज्ञात चोरट्याने दोन खोल्यांचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. १० ऑक्टोबरच्या रात्रीपासून ११ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. या घटनेत कोणताही मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद नसली, तरी बंद खोल्यांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आकाश इमारतीच्या तळमजल्यावरील रूम क्रमांक ७४ आणि ७५ यांच्या कडी-कोयंड्यांची अज्ञात व्यक्तीने हत्याराच्या साहाय्याने तोडफोड केली. चोरी करण्याच्या उद्देशाने खोल्यांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत घडल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे.
या प्रकरणी परिमल मुरारीसहाय वर्मा (वय ४९, सध्या रा. डी-१०, फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५ आणि ६२ अन्वये पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा मुद्देमाल गेला नसल्याची नोंद असून, या प्रकारामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


