(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील गलथान कारभारावरून पालकमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचून, दररोज ६० दस्तांची नोंदणी पूर्ण करण्याचे सज्जड दम दिले आहेत. निबंधक कार्यालयाला ‘रात्री १० वाजेपर्यंत काम करा’ असा आदेश मिळाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे असली, तरी याच महसूल विभागाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या भूमी अभिलेख विभागातील भोंगळ कारभाराचे काय, असा संतप्त सवाल आता जनतेमधून विचारला जात आहे. या विभागाच्या मनमानी आणि संथ कारभारामुळे हतबल झालेल्या नागरिकांवर चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याची वेळ येत असून, या कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी पालकमंत्री ‘सर्जिकल स्ट्राईक’ कधी करणार, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्षांनी वकिलांच्या समस्या मांडताच पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने बैठक घेऊन सहदुय्यम निबंधकांना धारेवर धरले. इतकेच नव्हे तर बैठकीतूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन लावून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मात्र, दुसरीकडे भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी, हद्द निश्चिती, नकाशे दुरुस्ती आणि प्रलंबित प्रकरणांसाठी सामान्य शेतकरी आणि नागरिक महिनोनमहिने उंबरठे झिजवत आहेत. तेथे ना कोणाचा वचक राहिला आहे, ना कामाचा वेग! भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि लालफितीच्या कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. साध्या कामांसाठीही चिरीमिरीशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात सुरू असतात. आपली हक्काची कामे होत नसल्याने आणि तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने, अखेर संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी नागरिकांना उपोषणास बसावे लागणे, हे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी अत्यंत लाजिरवाणे मानले जात आहे.
सहदुय्यम निबंधक कार्यालयाप्रमाणेच भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. केवळ वकिलांच्या संघटनेचा दबाव आला म्हणून एका विभागावर कारवाई करायची आणि सर्वसामान्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करायचे, अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता भूमी अभिलेख कार्यालयाचाही ‘क्लास’ घेऊन या यंत्रणेला वठणीवर आणावे, अशी मागणी रत्नागिरीतील नागरिकांमधून होत आहे.


