(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील वाटव-खंडाळा येथील राकेश जंगम च्या खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याने निलेश भिंगार्डे व अन्य एका साथिदाराच्या मदतीने राकेश जंगम याचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी निलेश भिंगार्डे याला सांगली येथून अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, निलेश याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पोलिस तपासानुसार, ६ जून २०२४ रोजी दुर्वास पाटील याने कोल्हापूरला जाण्याचा बहाणा करून राकेश जंगम याला आपल्या कारमधून नेले. त्या वेळी कारमध्ये दुर्वास पाटील याच्यासह निलेश भिंगार्डे व आणखी एक संशयित उपस्थित होता. प्रवासादरम्यान राकेशचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह आंबा घाटात टाकून देण्यात आला, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान निलेश यांच्या वकिलांनी न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, मुख्य आरोपी दुर्वास पाटील याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्या चौकशीतून या खून प्रकरणाची माहिती समोर आली. त्या खुलाशावरूनच निलेश याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध स्वतंत्र व ठोस पुरावे नाहीत. तसेच, आरोपीला जामीन दिल्यास तो न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करेल व पोलिस तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, असेही सांगण्यात आले. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य, तपासातील पुरावे आणि प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेता सत्र न्यायालयाने निलेश भिंगार्डे याचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे खून प्रकरणातील पुढील तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

