(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील थिबा पॅलेस रोडवर मध्यरात्री भरधाव चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकच गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या चारचाकीने जिओ कंपनीचा पोल, एका बंगल्याचे गेट, कंपाऊंड वॉल तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या अल्टो कारला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अमानत बंगला समोरील थिबा पॅलेस रोडवर हा प्रकार घडला. याबाबत फतिन फकीर महम्मद वास्ता (रा. अमानत बंगला, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयित सचिन नाना बुलाखे हा एमएच ०२ डी झेड ५९४१ क्रमांकाची चारचाकी मथुरा हॉटेलच्या दिशेने चंद्रशेखर डेअरीकडे भरधाव वेगाने नेत होता. वाहन बेदरकारपणे चालविल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नियंत्रण सुटल्यानंतर वाहनाने सर्वप्रथम जिओ कंपनीच्या पोलला धडक दिली. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या तक्रारदाराच्या बंगल्याचे गेट आणि कंपाऊंड वॉलला जोरदार धडक बसली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. वाहन पुढे जाऊन आणखी एका अल्टो कारला (एमएच ४३ एएन ९९९७) धडकल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. या घटनेत अल्टो कारच्या मालकाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नसली, तरी तक्रारदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४) अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या जोरदार धडकांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र, एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने विविध मालमत्तांना धडक देत वाहन थांबल्याने रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वेग आणि वाहनचालकांच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात रात्री १२.५१ वाजता नोंद करण्यात आली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


