(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशात जन्मलेल्याला बेकायदेशीररीत्या जन्मदाखला दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात संबंधित ग्रामविकास अधिकारी वासुदेव सायके यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू असून, लवकरच यासंदर्भातील सविस्तर माहिती मुंबई पोलिसांकडून घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.
२०२० मध्ये जारी करण्यात आला होता दाखला
मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात बांगलादेशात जन्मलेला व्यक्ती (जन्मतारीख १ मे १९८३) याने शिरगाव ग्रामपंचायतीकडे २०२० साली जन्मदाखल्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने कोणत्याही योग्य कागदपत्राविना त्यास दाखला दिल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत, तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी ग्रामविकास अधिकारी सायके यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले.
सध्या सायके यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू असून, दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून या प्रकरणावर खुलासा मागविण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी तथ्ये आणि जबाबदाऱ्यांची शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपशील मागवण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.