(राजापूर/ रत्नागिरी)
वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक, जिवंत काडतूस आणि बॅटरीसह बोलेरो पिकअपमधून फिरत असल्याच्या संशयावरून राजापूर पोलिसांनी तिघांविरोधात कारवाई केली. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे २.१५ वाजता कळसवली येथील मारुती मंदिर, चुनाकोळवण फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या वेळी बंदूक, काडतूस, बॅटरी आणि बोलेरो पिकअप असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नारायण बाणे (वय ३२, रा. पाटीलवाडी, कळसवली), विजय काशीनाथ तरळ (वय ४४, रा. तरळवाडी, कळसवली) आणि अमित कृष्णा बाणे (वय ४५, रा. पाटीलवाडी, कळसवली) हे तिघे बोलेरो पिकअपमधून जात असताना पोलिसांना आढळले. वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने त्यांनी विनापरवाना बंदूक व अन्य साहित्य ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे. या कारवाईत १० हजार रुपये किमतीची जुनी सिंगल बॅरल बंदूक, १२० रुपये किमतीचे ‘शक्तिमान १२ एक्सप्रेस’ असे नमूद असलेले जिवंत काडतूस, ३ हजार २०० रुपये किमतीची वायर जोडलेली बॅटरी आणि २ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली. या वाहनाच्या पुढील काचेवर ‘कृष्णलीला’ असे लिहिलेले असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चंद्रकांत घोगले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) आणि भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३/२५(१)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत. बंदूक, जिवंत काडतूस आणि प्रकाशासाठी वापरली जाणारी बॅटरी एकाच वाहनातून जप्त झाल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात वन्य प्राण्यांची शिकार झाली होती का, तसेच जप्त शस्त्राचा वापर करण्यात आला होता का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.


