[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
जिल्ह्यात सुरू असलेली बेकायदा वाळू वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणारी वाहने तसेच विना नंबर प्लेट वाहनांच्या वापराला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. ‘वायुवेग पथका’मार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी नियमित तपासणी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या काही कालावधीत झालेल्या या कारवाईत दीड कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
ओव्हरलोड वाहतुकीविरोधातील कारवाईत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ४ हजार ९७२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणारी ३५५ वाहने आढळून आली. या वाहनांकडून १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीतही तपासणीची धडक कायम ठेवण्यात आली. या काळात २ हजार २७४ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोषी आढळलेल्या १९२ वाहनांवर कारवाई करून ३५ लाख ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहनांना नंबर प्लेट नसणे किंवा नियमबाह्य पद्धतीने वाहनांचा वापर करणे यावरही आरटीओ विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ५ हजार ८४४ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८३ वाहने दोषी आढळली असून, संबंधितांकडून १ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत १ हजार ७५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमभंग करणारी १४७ वाहने आढळून आली असून, त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाळू वाहतूक असो किंवा क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणारी वाहने; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यात येत आहे. केवळ दंडात्मक कारवाईपुरते मर्यादित न राहता वाहनधारक व वाहतूकदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी आरटीओ विभागाकडून जनजागृती आणि प्रबोधनही केले जात आहे. जिल्ह्यातील रस्ते अधिक सुरक्षित राहावेत आणि नियमबाह्य वाहतुकीला आळा बसावा, यासाठी वायुवेग पथकाची तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

