(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली असून, गस्तीसाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. बंदीकाळात मासेमारी करताना आढळणाऱ्या नौकांवर परवाना रद्द करणे, डिझेल कोटा स्थगित करणे तसेच नौकेवरील साहित्य जप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. १ जून ते दि. ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी लागू राहणार आहे. मात्र, पावसाळा नियमितपणे सुरू होण्यास विलंब होत असल्याने काही मच्छिमार नौका या काळातही समुद्रात उतरत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळी हंगामात समुद्रातील वातावरण धोकादायक बनत असल्याने नौकेवरील खलाशी, तांडेल आणि पार्गी यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. त्याचबरोबर हा कालावधी मत्स्य प्रजननासाठी महत्त्वाचा असल्याने अनधिकृत मासेमारीमुळे सागरी जैवसाखळीवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने गस्त आणि तपासणीसाठी पाच स्वतंत्र पथके कार्यरत केली आहेत. या पथकांमध्ये विभागीय अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक तसेच ‘सागर मित्र’ यांचा समावेश करण्यात आला आहे. बंदीकाळात समुद्रकिनारे, मासळी उतरवण्याची ठिकाणे आणि धक्के परिसरात विशेष तपासण्या केल्या जाणार आहेत. दरम्यान, अनधिकृत मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांविरोधातही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव उपनिबंधकांकडे पाठवला जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी पथकांकडून मासळी उतरवण्याच्या ठिकाणी अचानक धाडी टाकण्यात येणार असून, कारवाईदरम्यान शस्त्रधारी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. तसेच कारवाईवेळी अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मच्छिमारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध मच्छिमार सहकारी संस्थांच्या परिसरात भित्तीपत्रके लावण्याचे काम सुरू करण्यात आले असून, नियमांचे पालन आणि सागरी संवर्धनाबाबत कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येत आहे.

