(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे ते रत्नागिरीदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत या मार्गावर एकूण 6 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार असून, 12 ते 26 सप्टेंबरदरम्यान त्यांची सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पुणेकर आणि चाकरमान्यांना ऐन सणासुदीत गावी जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे पर्याय मिळणार असून, नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.
गाडी क्रमांक 01447 पुणे-रत्नागिरी विशेष 12, 19 आणि 26 सप्टेंबर रोजी धावणार आहे. पुण्याहून ही गाडी मध्यरात्री 12:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01448 रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी 5:50 वाजता रत्नागिरीहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 वाजता पुण्यात दाखल होईल.
याशिवाय गाडी क्रमांक 01445 पुणे-रत्नागिरी विशेष 15 आणि 22 सप्टेंबर रोजी चालवली जाणार आहे. ही गाडी पुण्याहून मध्यरात्री 12:25 वाजता सुटून सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीत पोहोचेल. तिची परतीची गाडी क्रमांक 01446 रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी 5:50 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 वाजता पुण्यात पोहोचेल.
प्रवाशांना विविध भागांतून या विशेष गाड्यांचा लाभ घेता यावा, यासाठी पुणे ते रत्नागिरीदरम्यान अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावरडा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांचा त्यामध्ये समावेश आहे.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह (Special Charges) सुरू झाले आहे. प्रवाशांना रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस (PRS) तिकीट खिडक्यांवरून तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावर किंवा ॲपवरून तिकीट बुक करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो भाविक आणि चाकरमान्यांना प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.


