(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर येथे मारुती मंदिरासमोरील अमित पासवान यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना रात्रभर शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मध्यरात्री १२.४८ वाजता सुरू झालेले अग्निशमनाचे काम सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होते. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या कारवाईत परिसरातील घरे आणि दुकानांचे गाळे आगीपासून सुरक्षित ठेवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिरासमोरील भंगार गोदामाला मध्यरात्री आग लागली. गोदामातील भंगार साहित्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. आग आसपासच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच देवरुख येथील अग्निशमन बंब सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर चिपळूण नगरपरिषद, रत्नागिरी एमआयडीसी आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. अनेक अग्निशमन बंबांच्या मदतीने आग विझविण्याची मोहीम रात्रभर सुरू ठेवण्यात आली. आगीचा फैलाव रोखण्यासाठी जवानांनी मोठी कसरत केली.
या अग्निशमन मोहिमेत मुकादम लिंगप्पा हळमणी, सागर तळेकर आणि आकाश करंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यरात्रीपासून सकाळी ७ वाजेपर्यंत सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आग नियंत्रणात आणता आली. परिसरातील घरे आणि दुकानांचे गाळे आगीच्या तडाख्यातून वाचविण्यात यश आल्याने संभाव्य मोठे नुकसान टळले.
या आगीत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे भंगार साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.


