(गुहागर / रत्नागिरी)
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीच्या जेटीजवळ समुद्रात एका २२ वर्षीय जहाजावरील प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली. राहुल कुमार लालसाहेब यादव (वय २२, रा. शरीफपूर, शिखी खुर्द, ता. हंडिया, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. जहाजापासून काही अंतरावर समुद्राच्या पाण्यात तो तरंगताना आढळल्यानंतर त्याला स्पीड बोटीच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील खबर देणारे शाहरुख हिशामुद्दीन हुसैन हे ओशन स्पार्कल लिमिटेड कंपनीच्या ‘ओशन स्वान १’ या जहाजावर टग मास्टर म्हणून कार्यरत आहेत. राहुल यादव हा २३ सप्टेंबर २०२६ पासून याच जहाजावर प्रशिक्षणार्थी डेक रेटिंग म्हणून काम करीत होता. १० ऑक्टोबर रोजी एलएनजी गॅस घेऊन आलेल्या ‘गॅस पोलारिस’ या जहाजाला जेटीजवळ आणून सुरक्षितपणे उभे करण्यासाठी ‘ओशन स्वान १’ जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मदत केली. सकाळी सुमारे ११.३० वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जहाजावरील कर्मचारी जेटीपासून काही अंतरावरील ब्रेकवॉटर परिसरात अँकर टाकून थांबले होते.
दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास शाहरुख हुसैन हे जेवण करून जहाजावरील खोलीत विश्रांतीसाठी गेले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी जहाजावरील सनी मसिह याने धावत येऊन राहुल यादव पाण्यात पडल्याचे सांगितले. त्याचा मोबाईल जहाजाच्या डेकवर असल्याची माहितीही त्याने दिली. ही माहिती मिळताच हुसैन यांनी तातडीने डेकवर धाव घेतली. त्यावेळी जहाजावरील अन्य कर्मचारीही तेथे उपस्थित होते. पाहणी केली असता, जहाजापासून काही अंतरावर राहुल पाण्यात उताण्या अवस्थेत तरंगताना दिसला. यानंतर जहाजावरील फर्स्ट मास्टर जय शंकर शर्मा यांनी जेटी कंट्रोल आणि सी केअर-६ सिक्युरिटीच्या स्पीड बोटीला व्हीएचएफद्वारे संपर्क साधून मदतीसाठी बोलावले. स्पीड बोटीच्या साहाय्याने राहुलला समुद्रातून बाहेर काढून मटेरियल जेटीवर आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला अंजनवेल येथील आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये दुपारी १.४५ वाजता दाखल करण्यात आले. तेथील डॉ. दीपक यांनी तपासणी करून दुपारी १.५७ वाजता त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. समुद्रात पडण्यामागील नेमके कारण स्पष्ट झाले आहे की नाही, याबाबत उपलब्ध तक्रारीत माहिती नमूद नाही. घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.


