(साखरपा / भरत माने)
साखरपा गावातील श्री जुगाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून, देवीच्या दर्शनासाठी ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
श्री जुगाई देवीच्या मंदिराचा परिसर सजावटीमुळे उजळून निघाला आहे. नवरात्रोत्सव हा गावातील श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि गावाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करीत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस गावातील प्रत्येक वाडीसाठी स्वतंत्र दिवसाची पाळी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत महाप्रसाद, जागर, झाखडी आणि भजन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस गावात देवीच्या भक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे.
उत्सवाच्या प्रारंभी पुजारी गुरव (लिंगायत) बंधू, गावकर गोवरे बंधू तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. श्री जुगाई देवीच्या नवरात्रोत्सवामुळे साखरपा गावात चैतन्य निर्माण झाले असून, उत्सवाच्या पुढील कार्यक्रमांकडे ग्रामस्थ आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.


