( देवरूख / सुरेश सप्रे )
देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा युतीच्या मृणाल शेट्ये यांनी १८०० मतांनी दणदणीत विजय मिळविला. देवरूख नगरपंचायत निवडणूकीत महायुतीचे वर्चस्व असले तरी गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ कमी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.
या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे प्रभाग ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व आम.निकम यांचे विश्वासू सहकारी हनिफ हरचिरकर तर प्रभाग १६ मधून माजी सभापती व उबाठा युवासेनेचे नेते छोट्या गवाणकर यांना मतदारांनी चकवा देत घरचा रस्ता दाखवून धक्का दिला आहे.
प्रभाग ८, ९, १०या प्रभागात अपक्षांनी बाजी मारत इतिहास घडविला आहे. प्रभाग १०मधून अपक्ष अक्षय झेपले यांनी भाजपचे बंटी पाडळकर यांचा तर गत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडुन आलेल्या व या निवडणुकीत घड्याळ हाती घेतलेल्या प्रभाग ९मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्षा वणकुंद्रे यांना भाजपा बंडखोर उमेदवार कविता नार्वेकर यांनी धोबीपछाड दिला. तर प्रभाग ८मधून अपक्ष, उमेदवार सिद्धेश वेल्हाळ यांनी भाजपचे सुबोध लोध व उबाठाचे भाई कुमठेकर यांचा पराभव केला.. देवरूख नगरपंचाय निवडणूकीत आजपर्यंत अपक्ष उमेदवार विजयी झालेले नसताना या निवडणुकीत चार अपक्षांनी बाजी मारत इतिहास घडवला आहे.
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे १७ पैकी १० नगरसेवक विजयी झाले. यामध्ये भाजपचे ३. शिवसेना शिंदे गट ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. तर, उबाठा शिवसेनेचे ३ तर १ भाजपा बंडखोर व ३अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवून आश्चर्याचा धक्का दिला.
सकाळी 10.00 वा नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची मतमोजणी नगर पंचायत येथील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमृता साबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशांत भोसले , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार यांच्या देखरेखी खाली पार पडली.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या मृणाल शेट्ये यांनी३६८९ मत मिळवत उबाठा शिवसेनाच्या सबुरी थरवळ (१८८४)व गाव पॅनलच्या स्मिता लाड (१८६२) यांचा एकतर्फी लढतीत दारुण पराभव करीत पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे.
प्रभागातील विजयी उमेदवार
१ समृद्धी वेलणकर (भाजपा)
२ यशंवत गोपाळ (राष्ट्रवादी)
३ संदिप गेल्ये (शिवसेना)
४ वैभव पवार (शिवसेना)
५ स्वाती राजवाडे (भाजपा.)
६ प्राची भुवड (राष्ट्रवादी.)
७ श्रद्धा इंदुलकर (भाजपा.)
८ सिद्धेश वेल्हाळ (अपक्ष)
९ सौ. कविता नार्वेकर (अपक्ष)
१० अक्षय झेपले (अपक्ष)
११ अनुराग कोचिरकर (अपक्ष)
१२ बाळा कामेरकर (उबाठा)
१३ रितिका कदम (उबाठा)
१४ नेहा आंबेकर (शिवसेना)
१५ निधा कापडी (उबाठा)
१६ दिपक खेडेकर (राष्ट्रवादी)
१७ रुपाली बेंद्रे (राष्ट्रवादी)
मतमोजणी शांततापूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूकीच्या काळात देवरूख चे पोलीस निरीक्षक झावरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

