(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वरच्या मातीतून घडलेल्या डॉ. अनुष्का मनीष चोचे यांनी कर्नाटकातील वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या बालकावर यशस्वी दंतोपचार करून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, सध्या त्या कर्नाटकातील तुमकूर येथील प्रतिष्ठित सिद्धार्थ डेंटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.डी.एस.) अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत.
लहान मुलांना दंतोपचारासाठी तयार करणे हे डॉक्टरांसमोरील मोठे आव्हान असते. विशेषतः तीन ते चार वर्षांच्या बालकांना उपचारादरम्यान भीती वाटू नये, त्यांचे सहकार्य मिळावे आणि उपचार यशस्वीरीत्या पूर्ण व्हावेत यासाठी विशेष संयम व कौशल्याची आवश्यकता असते. डॉ. अनुष्का यांनी बालकाची मानसिकता समजून घेत त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून यशस्वी दंतोपचार पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीतून वैद्यकीय कौशल्यासोबतच बालरुग्णांप्रती असलेली संवेदनशीलताही दिसून आली.
डॉ. अनुष्का यांनी बी.डी.एस. तसेच एम.डी.एस.च्या शैक्षणिक प्रवासात सातत्याने प्रथम श्रेणी आणि विशेष प्रावीण्य मिळवले आहे. अभ्यासातील गुणवत्ता कायम राखतानाच प्रत्यक्ष रुग्णसेवेतही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. एम.डी.एस.च्या अंतिम वर्षात शिक्षण सुरू असतानाच बालरुग्णांवर यशस्वी उपचार करण्याची कामगिरी त्यांच्या वैद्यकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
संगमेश्वरचे सुपुत्र मनीष चोचे यांच्या कन्या असलेल्या डॉ. अनुष्का यांनी उच्च शिक्षणासाठी कर्नाटकातील तुमकूर येथे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच प्रत्यक्ष रुग्णसेवेत मिळवलेले यश त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष देणारे आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चोचे कुटुंबीयांसह संपूर्ण संगमेश्वर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


