(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील रहिवासी आणि ज्येष्ठ सीए हेरंब लक्ष्मण पटवर्धन यांचे रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ते अत्यंत शिस्तप्रिय होते आणि कठोर निकषांचे काटेकोरपणे पालन करीत असत. मात्र, कामातील हा कडकपणा त्यांच्या वैयक्तिक स्वभावात कधीही दिसून येत नसे. ते मनमिळावू, प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते.
हेरंब पटवर्धन हे ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट (सीए) म्हणून परिचित होते. काल रात्री राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यावसायिक यांचेकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक नातू आणि एक नात असा परिवार आहे.
अंत्ययात्रा सोमवारी सकाळी
कै. हेरंब लक्ष्मण पटवर्धन यांची अंत्ययात्रा आज (सोमवार, १२ ऑक्टोबर) रोजी सकाळी ९.३० वाजता मारुती मंदिर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्यावर रत्नागिरीतील चर्मालय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. हेरंब लक्ष्मण पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण दामले विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण रा. भा. शिर्के प्रशालेत झाले. त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून बी.कॉम. आणि सांगली येथील चिंतामणराव पटवर्धन महाविद्यालयातून एम.कॉम. पदवी प्राप्त केली. बी.सी. अभ्यंकर अँड कंपनी येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते १९७२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी रत्नागिरीत स्वतंत्र व्यवसाय सुरू करून १० डिसेंबर १९७२ रोजी करविषयक सल्ला आणि लेखापरीक्षणाचे कार्यालय सुरू केले.
व्यवसायासोबतच त्यांनी १९७३ ते २००७ या काळात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बी.कॉम. व एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. १९७५ ते १९८९ या काळात देवगड महाविद्यालयातही लेखाशास्त्र विषय शिकवला. क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रिकेट विभागाची जबाबदारीही सांभाळली. याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठाची एलएल.बी. पदवी प्राप्त केली.


