(देवरुख / सुरेश सप्रे)
देवरुख शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चोरपऱ्या येथे उद्योजक मदन मोडक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाचे लोकार्पण नुकतेच पार पडले आहे. या उद्यानात थोर योद्धे आणि पराक्रमी सेनानी प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस असून त्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी, अशी मागणी मदन मोडक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उद्यानाची शोभा वाढविण्यासोबतच नव्या पिढीसमोर बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा आणि कर्तृत्वाचा आदर्श उभा राहावा, या उद्देशाने अश्वारूढ पुतळा देवरुखात आणण्यात आला आहे. मात्र आवश्यक प्रशासकीय परवानग्यांच्या प्रतीक्षेमुळे तो अद्याप स्थापित करण्यात आलेला नाही.
यासंदर्भात मदन मोडक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याची विनंती केली. यावेळी पुतळा उभारणीसाठी योगदान देणाऱ्या संस्थेचे कुंदन साठ्ये तसेच नगरकर उपस्थित होते.
दरम्यान, पुतळा उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर हे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास मदन मोडक यांनी व्यक्त केला. त्यामुळे देवरुख शहरातील प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानात हा भव्य अश्वारूढ पुतळा नेमका कधी उभारला जाणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

