(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्रीदेवी कालेश्वरी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त श्रीदेवी कालेश्वरी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रूपे लावण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कालेश्वरी प्रसादिक भजन मंडळ, वाणेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच स्वामी समर्थ वाद्यवृंदाच्या भक्तिसंगीत व भावगीतांच्या कार्यक्रमात रोहिणी नवाले, सीमा कोकाटे आणि जयंत पवार यांनी गीते सादर केली.
सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता नवतरुण भजन मंडळ, बाजारपेठ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सोनार सुतारवाडी भजन मंडळाचे भजन होईल. रात्री १० वाजता नाणीज येथील शिवगणवाडीच्या शक्तीवाले दत्तकृपा टिपरी नृत्य पथकातील शाहीर मालती गावडे आणि देवरुख येथील परशुरामवाडीच्या तुरेवाले श्री सोलजाई टिपरी नृत्य पथकातील शाहीर सुरभी लाड यांच्यात कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सौजन्य भास्कर डोंगरे यांनी स्वीकारले आहे.
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता वरची आळी भजन मंडळाचा कार्यक्रम होईल. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, मानेवाडी यांचे भजन, तर रात्री ११ वाजता गार्डीवाडी टिपरी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सोनार सुतारवाडी भजन मंडळाचे भजन होईल. त्यानंतर रात्री १० वाजता श्री संतोष दामोदर सावंत पुरस्कृत भजनांचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील दत्तप्रसादिक भजन मंडळाचे बुवा श्री. उदय पारकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शेळपी येथील डुंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा श्री. दयाळ रमेश बिडये यांच्यात सामना रंगणार आहे.
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता कालेश्वरी प्रसाद भजन मंडळ, बाजारपेठ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ११ वाजता मर्यादित फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सोनार सुतारवाडी भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दुर्गायाग, होम-हवन आदी धार्मिक विधी पार पडतील. दुपारी १.३० वाजता श्री चव्हाटा मित्र मंडळ, बाजारपेठ यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होईल. रात्री ९ वाजता श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
रात्री ठीक १० वाजता गुलाब खान पुरस्कृत शक्ती-तुरा नाचांचा जंगी सामना होईल. यात मुंबईतील दहिसर शाखेच्या श्री स्वामी समर्थ नाच मंडळाचे शक्तीवाले शाहीर बिनेश दिलीप वाजे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गोंडेसकल येथील श्री धनी केदारलिंग नाच मंडळ यांच्यातील कार्यक्रमाचा समावेश आहे. तसेच खेड तालुक्यातील पन्हाळजे येथील कोंडवाडीच्या तुरेवाले जय बजरंग बली नृत्य कलापथकाचे शाहीर जनार्दन नाचरे बुवा सहभागी होणार आहेत.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता नवतरुण भजन मंडळ, वाणेवाडी यांचे भजन होणार आहे. याशिवाय उत्सवाच्या कालावधीत दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत दांडिया रास नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी आणि ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी कालेश्वरी रवळनाथ मंदिर ट्रस्ट, देवळेचे अध्यक्ष गजानन शंकर काळोखे, श्री कालेश्वरी नवरात्र उत्सव कमिटी, देवळेचे अध्यक्ष शंकर उर्फ भाऊ कानडे, उपाध्यक्ष मनोरथ परशेटये, सचिव दीपक गुरव आणि देवळे ग्रामस्थांनी केले आहे.


