(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नौका आणि त्यावरील साहित्य स्थलांतरित करू नये, अशी नोटीस देण्यात आलेली असतानाही संबंधित नौका व साहित्य अन्यत्र हलविल्याचा प्रकार रत्नागिरीतील कर्ला जेटी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नौकेच्या मालक महिलेविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिन्मय संजय जोशी (वय ३०, व्यवसाय : सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, रा. गोडबोले नगर, नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुंगधा सचिन टाकळेरा (रा. पंधरा माड, मच्छीमार वसाहत, रत्नागिरी) यांच्या मालकीची ‘गुरुप्रसाद’ ही नौका (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-3766) आणि नौकेवरील साहित्य स्थलांतरित करू नये, अशी नोटीस संबंधितांना देण्यात आली होती. मात्र, ही नोटीस असतानाही नौका आणि त्यावरील साहित्य स्थलांतरित केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३(अ) अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १.०७ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


