(मंडणगड / रत्नागिरी)
शेतजमिनीच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे उघडकीस आली आहे. जमिनीवर बसविलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचे डीव्हीआर मशीन असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदन परबत दळवी यांच्या मालकीची दुधेरे येथील सर्व्हे क्रमांक ३२(१), ३२(२), ३२(५), ३३(६) आणि ३३(७) मधील जमिनीवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी प्रवेश करून चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक डीव्हीआर मशीन चोरून नेले. चोरीस गेलेल्या चार कॅमेऱ्यांची अंदाजे किंमत पाच हजार रुपये, तर डीव्हीआर मशीनची किंमत पाच हजार रुपये असून, एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी बाळाराम अनंत जोशी (वय ४०, रा. दुधेरे, बारकोंबडावाडी, ता. मंडणगड) यांनी तक्रार दिली. मालकाशी विचारविनिमय केल्यानंतर तक्रार देण्यात आल्याने ती उशिराने दाखल झाली.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


