(राजापूर /रत्नागिरी)
शहरातील सार्वजनिक रस्त्यावर मासे विक्री करताना माशांची खवले आणि दूषित पाणी टाकून परिसरात दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी १३ महिला विक्रेत्यांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी पथ ते बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महालक्ष्मी हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. धोपेश्वर, पन्हळे, ता. राजापूर) हे पाणीपुरवठा, आरोग्य व पर्यावरण विभागातील कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार आणि सफाई कर्मचारी संदेश नाना जाधव यांच्यासह कारवाईसाठी गेले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी हॉटेलसमोरील रस्त्यावर १३ महिला मासे विक्री करताना आढळून आल्या. यावेळी माशांची खवले आणि माशांचे पाणी रस्त्यावर टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे नगरपरिषद पथकाच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संबंधित महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी नरजहाँन सोलकर, नाजिया वाडकर, निहा सोलकर, सुमैया बोरकर, रजिया पटेल, सादिका फणसोपकर, नसरिन सोलकर, अक्सा समीर सोलकर, निलोफर होडेकर, रहमा सोलकर, हनिफा मौला, शबाना काझी आणि चिरादुन पावसकर या १३ महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम २६७ व २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ अन्वये राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे.


