(चिपळूण /रत्नागिरी)
बहिणीच्या घरात येण्यावरून झालेल्या वादातून संतापलेल्या भावाने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून भावाला जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे घडली. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात जखमी संतोष बाबा वरक (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश बाबा वरक (वय ३०, दोघेही रा. कादवड धनगरवाडी, ता. चिपळूण) याच्याविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, संतोष वरक हे दोन मुलांसह देवदर्शनासाठी खेड येथे गेले होते. ते घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांची बहीण विमल सचिन झोरे (रा. खोपी शिरगाव, ता. खेड) ही सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरी आली. यावेळी आरोपी रमेश याने तिला उद्देशून, ‘तू इथे का आलीस? तु इथे यायचे नाही. हे घर माझ्या बापाचे आहे,’ असे म्हटल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावर संतोष वरक यांनी, ‘हे घर तुझ्या वडिलांचे आहे, तसेच तिच्याही वडिलांचे घर आहे. ती येथे येणारच,’ असे प्रत्युत्तर दिले. याचा राग आल्याने रमेश याने घरातील लाकडी दांडका उचलून संतोष यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यानंतर आरोपी तेथून निघून जाताना, ‘माझ्या शेतीमध्ये पाय टाकायचा नाही, अन्यथा तुम्हाला बघून घेईन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


