(खेड /रत्नागिरी)
मजुरीचे पैसे न देता बळजबरीने चिरेखाणीवर काम करून घेणे, कामास विरोध केल्यास मारहाण करणे आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असा गंभीर प्रकार खेड तालुक्यातील घाणेखुंट आणि दाभीळ येथील चिरेखाणींवर घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन मुकादमांविरोधात वेठबिगारी प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कल्लू बनवासी (वय ३३, व्यवसाय मजुरी, मूळ रा. नया बाजार, उत्तर प्रदेश, सध्या रा. घाणेखुंट, सुर्वेवाडी येथील चिरेखाण) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सप्टेंबर २०२६ पासून २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत घाणेखुंट आणि दाभीळ येथील चिरेखाणींवर मुकादम राम धनसिंग राठोड आणि भरत धनसिंग राठोड यांनी त्यांना मजुरीचे पैसे न देता बळजबरीने कामे करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपल्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने तसेच बळजबरीने काम करून घेतले जात असल्याने फिर्यादी यांनी विरोध केला असता, दोन्ही मुकादमांनी वेळोवेळी हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित दोन्ही आरोपी मूळचे रामपूर, ता. सिंदगी, जि. विजापूर (कर्नाटक) येथील असून सध्या घाणेखुंट, कातळवाडी येथे वास्तव्यास आहेत.
या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४२ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४६, ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) तसेच वेठबिगारी पद्धती (उच्चाटन) कायद्याच्या कलम १६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. लोटे पोलीस दूरक्षेत्रातील नोंद क्रमांक १२१/२०२६ वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार कदम (बक्कल क्रमांक १३९४) तपास करीत आहेत. या प्रकरणामुळे चिरेखाणींवरील कामगारांच्या मजुरीचा मोबदला, कामाच्या अटी आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


