(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
रोजच्याप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेला सौरभ काही क्षणांतच काळाच्या जबड्यात सापडेल, याची पुसटशी कल्पनाही त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत कळवंडे येथील २५ वर्षीय सौरभ महादेव वाघे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या गेट क्रमांक २ जवळ हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात घडला. या प्रकरणी कंटेनरचालक विपुल रामअवतार सिंग (वय २७, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विपुल सिंग हा कंटेनर क्रमांक एमएच ४६ बीयू ५३९१ घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सौरभ वाघे हे आपल्या पेंशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच ०८ एएम ६४२२ वरून चिपळूणहून लोटे येथे कामावर निघाले होते. परशुराम घाटातील तीव्र उतार आणि मोठ्या वळणावर कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेला आणि समोरून येणाऱ्या सौरभ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सौरभ यांचा मृत्यू झाला. अपघातात कंटेनरचालकालाही दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ रामपूरकर, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, तुषार राठोड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कंटेनरचालकाला उपचारासाठी परशुराम येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले, तर सौरभ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी सौरभ यांचे वडील महादेव सखाराम वाघे (वय ५५, व्यवसाय शेती, रा. कळवंडे, सातीनवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली. कंटेनरचालकाने घाटातील उतार आणि वळणाच्या रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसतखेळत घराबाहेर पडला; परतला तो निश्चल देह!
सौरभ लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे सकाळी दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. मात्र, कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याआधीच परशुराम घाटातील अपघाताने त्यांच्या आयुष्याचा प्रवास कायमचा थांबवला. घरातून कामावर गेलेला मुलगा पुन्हा कधीच परतणार नाही, ही कल्पनाच वाघे कुटुंबीयांसाठी काळीज पिळवटून टाकणारी ठरली. सौरभ यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळवंडे गावात पोहोचताच शोककळा पसरली. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या अकाली जाण्याने वाघे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. सौरभ यांचा मृतदेह पाहताच आई-वडील आणि पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता. बुधवारी सायंकाळी कळवंडे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कळवंडे पंचक्रोशीतील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून वाघे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांची श्रद्धांजली!
सौरभ यांच्या वडिलांचा गुहागर-चिपळूण मार्गावरील कळवंडे-करंबवणे फाटा येथे हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच व्यवसाय मित्र मंडळ, कोंढे-करंबवणे फाटा या संघटनेच्या सदस्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून सौरभ यांना श्रद्धांजली अर्पण केली. एका तरुणाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण पंचक्रोशी सुन्न झाली असून, एका कुटुंबाचे स्वप्न आणि आधार क्षणात हिरावला गेल्याची वेदना परिसरातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.


