(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ अवघड वळणावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण गॅस टँकर अपघातानंतर तब्बल पंधरा तासांनी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. अपघातात टँकर थेट २५ फूट दरीत कोसळला होता. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात तातडीचा धोका निर्माण झाला होता. मात्र, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वित आणि तात्काळ कारवाईमुळे संभाव्य जीवितहानी टळली, आणि अखेर मंगळवारी (29 जुलै) दुपारी वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
टँकर पलटताच एलपीजी गॅसची गळती सुरू झाली होती. त्यामुळे काही वेळातच हातखंबा परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन मध्यरात्री अपघातस्थळालगतच्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांनी मध्यरात्री स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस गळती मध्यरात्री रोखण्यात यश आले. त्यानंतर एलपीजीचा साठा दुसऱ्या टँकरमध्ये स्थानांतरित करण्यात आला. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस, अग्निशमन दल, महसूल अधिकारी आणि एमआयडीसीचे विशेष पथक रात्रभर सक्रिय होते.
दरम्यान अपघात घडल्यानंतर रात्रीपासूनच गॅस गळती आणि रेस्क्यू ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा-पाली रस्ता पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. पर्यायी मार्ग म्हणून बावनदी, पावस–लांजा, आणि काजरघाटी मार्गावर वाहतूक वळवण्यात आली होती. महामार्गावरील मोठ्या वाहनांच्या रांगा रात्रीपासून पहाटेपर्यंत कायम होत्या. अखेर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवण्यात आला, आणि गळतीचे सर्व स्रोत बंद केल्याची खात्री झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांची टीम संपूर्ण वेळ घटनास्थळी सजगपणे कार्यरत होती.
पोलिस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक
ही घटना प्रशासनासाठी एक मोठं आव्हान ठरली, मात्र पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि यंत्रणांमधील समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनीही पोलिस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.