(चिपळूण)
मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार घेऊन जाणारा कारचालक कुंभार्ली घाटातील पोलिस चौकीसमोरच लोखंडी बॅरिकेड्सवर आदळला. ही घटना रविवारी दुपारी घडली असून, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षातच येताच त्याच्यावर शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल अशोक उमापे (३५, रा. लाडेगाव, खटाव, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या कारचालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन फडतरे यांनी दिली आहे. अनिल उमापे हा कार घेऊन लाडेगाव, खटाव, सातारा ते हर्णे, दापोली, रत्नागिरी असा विजापूर ते गुहागर रस्त्याने जात होता. दरम्यान, कुंभार्ली पोलिस चौकीसमोरील रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेड्सला जाऊन कार धडकली. अनिल उमापे हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.