(चिपळूण / वार्ताहर)
‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, ज्ञानेशकुमार राजीनामा द्या’, ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो’, अशा घोषणांनी आज (बुधवारी) चिपळूण शहर दणाणून गेले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात महामोर्चा काढण्यात आला. या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील फडणवीस सरकारवरही जोरदार टीका करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
महामोर्चापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. गेल्या बारा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचे चित्र असून या कालखंडात देशाची अधोगती अधिक झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी संपल्यानंतर निवडणुकीला सामोरे जात लोकशाही आणि संविधानाची मूल्ये जपली, असेही ते म्हणाले.
SIR प्रक्रियेमुळे कोट्यवधी नागरिकांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला. जिवंत असलेल्या मतदारांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांचे यापूर्वी मतदान झालेले असतानाही किरकोळ त्रुटींच्या आधारे मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे ही प्रक्रिया लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा दावा करताना, त्यापैकी लाखो नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदवल्या, तरीही त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नसल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.
महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मतदार यादीतील नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘मतांची चोरी सुरू आहे’, असा थेट आरोप करत आमदार जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
महामोर्चात माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शिरीष काटकर, बारक्याशेठ बने, भरत लब्धे, बाळा कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. SIR प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महामोर्चाला जिप्सी कॉर्नर येथून सुरुवात झाली. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सभा घेण्यात आली. त्यानंतर चिंचनाका, भोंगळे, मध्यवर्ती बसस्थानक, विरेश्वर तलाव मार्गे मोर्चेकरी प्रांत कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. संपूर्ण मार्गावर विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रांत कार्यालयासमोर मोर्चेकरी मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर तेथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या निवडक शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आमदार भास्करराव जाधव यांनी यावेळी प्रांत कार्यालयासमोर मोर्चाची भूमिका थोडक्यात मांडली. SIR प्रक्रियेमुळे मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ नये तसेच पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीवायएसपी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या उपस्थितीत बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली. मोर्चाच्या मार्गासह प्रांत कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


