(देवरूख / सुरेश सप्रे)
चिपळूण तालुक्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाशिष्ठी नदीचे पाणी आटू लागले असताना मौजे कळबस्ते येथे एक विलक्षण प्रकार घडला आहे. गावातील प्रशांत घोरपडे यांच्या शेतात तब्बल १२ फूट लांबीची मगर आढळून आली. त्यांनी तात्काळ वन विभागास याबाबत कळवले.
कळवणी मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रामपूर येथील राहुल गुंठे, फिरते पथकातील दत्ताराम सुर्वे, विशाल पाटील, प्रणित कोळी, आबलोलीचे कुमार पवार, वाहनचालक नंदकुमार कदम, वॉचमन संजय अंबोकर, सचिन भैरवकर तसेच सर्पमित्र शिवराज शिर्के, प्रणित काळकुटकी, प्रथमेश पवार आणि सुरेंद्र भोंडवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने कुशलतेने बचावकार्य पार पाडत मगर पिंजऱ्यात जेरबंद केली. तपासणीनंतर मगर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे खात्री करून तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर संपूर्ण बचावकार्य विभागीय वन अधिकारी सौ. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक सौ. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. स्थानिकांनी वन विभागाच्या या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.

