(मंडणगड / वार्ताहर)
नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाच्या मंडणगड तालुक्यातील तुळशी येथील बंद घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
लखन परशुराम मोहिते (वय ३३, मूळ रा. तुळशी, ता. मंडणगड; सध्या रा. हिंजवडी फेज १, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांची बहीण घराची साफसफाई करण्यासाठी तुळशी येथील घरी गेली असता, घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरातील कपाटांमधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने तिने तत्काळ मोहिते यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मोहिते यांनी घरी येऊन पाहणी केली असता, अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे आणि खोलीतील कपाटे उचकटून चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, तांब्या-पितळेची भांडी तसेच २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत १ लाख ९५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद घरात झालेल्या या चोरीचा तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.


