(चिपळूण / वार्ताहर)
तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे बुधवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या काठावर अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घरामागील नदीघाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५) यांच्यावर पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंदिनी यांनी प्रसंगावधान राखत काठावरील मोठा दगड घट्ट पकडून ठेवला. त्याचवेळी हा थरारक प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने स्वर्णी हिने धाडस दाखवत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचले. त्यामुळे नंदिनी यांचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी पवार या बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मुलगी स्वर्णी हिच्यासोबत घरामागील वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धूत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. मगरीने नंदिनी यांच्या पायाचा जबड्यात पकड घेत त्यांना खोल पाण्याकडे ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नंदिनी घाबरल्या आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, त्याचवेळी त्यांनी काठावरील मोठा दगड घट्ट पकडून स्वतःला पाण्यात ओढले जाण्यापासून रोखले.
आईला मगर पाण्यात ओढत असल्याचे लक्षात येताच स्वर्णीने घाबरून न जाता तातडीने आईच्या मदतीला धाव घेतली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचले. या चिमुकलीच्या धाडसामुळे नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली. या हल्ल्यात नंदिनी जखमी झाल्या असून त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनविभागाच्या पथकासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले, वनरक्षक रा. भा. गुंटे, लिपिक एस. ए. कलावंत आणि आरआरटी सदस्य अथर्व घाग यांनी रुग्णालयात नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच नंदिनी यांना धीर देत वनविभाग त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात उतरणे टाळावे. तसेच लहान मुलांना नदीकाठावर किंवा पाण्याजवळ एकटे जाऊ देऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी सांगितले.
दरम्यान, मगरीच्या हल्ल्यात सापडलेल्या आईला वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत धाडसाने तिचा हात पकडून पाण्याबाहेर खेचणाऱ्या १० वर्षीय स्वर्णीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या धाडसामुळे एका क्षणी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आईला जीवदान मिळाले.

