(मंडणगड)
तालुक्यातील शिरगाव गोमुख परिसरात पंपहाऊस फोडून ५ एचपी क्षमतेचा विद्युत पाण्याचा पंप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील रहिवासी व पंपचालक सुनिल मधुकर पाटील (वय ४६) यांच्या ताब्यातील पंपहाऊसमधील बंद स्थितीतील सुमारे १० हजार रुपये किमतीचा ५ एचपी क्षमतेचा विद्युत पाण्याचा पंप अज्ञातरीत्या चोरीस गेला. चोरट्यांनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या कोणत्यातरी अवजाराच्या सहाय्याने काढून उचकटल्या आणि आत प्रवेश करून पंप लंपास केला. हा प्रकार फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी सिकंदर रमेश कनोजिया (वय ३०), मोहित रमेश कनोजिया (वय २१, दोघेही रा. महाड, जि. रायगड, मूळ रा. उत्तरप्रदेश), तसेच आकाश प्रकाश पवार (वय २५) आणि अविनाश दिपक जाधव (वय २४, दोघेही रा. आकले, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११.५० या वेळेत शिरगाव गोमुख येथे घडली. याप्रकरणी २६ मार्च रोजी सायंकाळी ६.०६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार पुढील तपास सुरू आहे.

