(मंडणगड/ रत्नागिरी)
आंबेत-म्हाप्रळ मार्गावरून विनापरवाना खैर लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत खैराच्या लाकडासह संबंधित वाहन जप्त करण्यात आले असून, जप्त लाकडाची किंमत १२ हजार ६८२ रुपये असल्याची माहिती आहे.
वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आंबेत पोलीस ठाण्याच्या परिसरात पथकाने सापळा रचला. संशयित वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये खैराचे सोलीव नग आणि सोलीव किटा या वनउपजाची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळले. त्यानंतर वन विभागाने संबंधित लाकूड आणि वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी मंडणगड येथील अरविंद सखाराम काते यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ तसेच महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मांदाटणे वन परिमंडळाचे वन परिमंडळ अधिकारी तुळशीराम चावरेकर करीत आहेत. वनसंपत्तीची विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी वन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


